मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना अटक करण्यात आल्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्णब यांच्यावरील अटकेच्या कारवाईचे स्वागत केले. अर्णब गोस्वामींमुळेच मागील सरकारने हे प्रकरण दाबले, असा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला.

अन्वय नाईक यांनी २०१८ मध्ये त्यांच्या घरी आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना आज, बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यामुळे नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले. २०१८मधील तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असे अक्षता म्हणाल्या.

यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव असूनही कारवाई का केली नव्हती, असा सवाल मुलगी आज्ञाने उपस्थित केला. आमचे फोन टॅप केले जात होते. आम्हाला धमक्या दिल्या जात होत्या, असेही त्यांनी सांगितले. अर्णब यांच्यामुळेच मागील सरकारने हे प्रकरण दाबले असा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला.

आमच्यावर दबाव

या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी वऱ्हाडे यांनी हे प्रकरण मागे घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला असा गंभीर आरोप करतानाच, आम्हाला मराठी वाचता येत नाही, असा समज करून त्यांनी चुकीच्या कागदपत्रांवर सही करून घेण्याचा प्रयत्न केला, असेही नाईक कुटुंबीयांनी सांगितले. ही तक्रार मागे घेण्यासंदर्भातील ते कागदपत्र होते. शिवाय आम्ही सूडबुद्धीने तक्रार दाखल केली आहे, असा उल्लेख त्यात केला होता. मात्र, आम्ही त्यावर आवाज उठवला, असेही त्यांनी सांगितले.

अर्णब गोस्वामींना एवढं महत्व का?

२०१७ रोजी काम पूर्ण झाले होते. मात्र, पैसे मिळाले नव्हते. लोकांची देणी होती. त्यामुळे नैराश्येतून अन्वय नाईक यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती अक्षता नाईक यांनी दिली. अर्णब गोस्वामी यांच्याकडून अद्याप ८३ लाख रुपये येणे बाकी आहेत, असे सांगतानाच अन्य आरोपी फिरोज शेख आणि सारडा यांनाही पैसे देऊ नका असे गोस्वामींनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केला. गोस्वामींना भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले. पाच मिनिटे वेळ द्या अशी विनंतीही केली. मात्र, त्यांनी भेटण्यासाठी वेळ दिला नाही. या प्रकरणात आम्ही तत्कालीन आयुक्त संजय बर्वे यांचीही भेट घेतली होती. तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याही अनेकदा भेटी घेतल्या. तपास सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात आले. पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. या प्रकरणात गोस्वामी यांचा जबाब अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांचा जबाब जॉइंट सीपींच्या कार्यालयात जाऊन नोंदवला आहे. एवढं महत्व आरोपीला का देण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here