देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑक्टोबर रोजी ट्विट करून करोना संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे ते पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांतच दाखल झाले होते. आज यशस्वी उपचारांनंतर त्यांनी करोनावर मात केली आहे. रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी सर्वांना हात जोडून अभिादनही केलं आहे.
फडणवीस यांना डिस्चार्ज जरी मिळाला असला तरी त्यांना अजून १० दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यानं त्यांना अधिक काळजी घेण्याची गरज होती. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. त्यामुळं त्यांना रेमडिसिव्हिर इंजेक्शन आणि प्लाझ्मा देण्यात येत होते, असं सँट जॉर्ज रुग्णालयातील डॉ. आकाश खोब्रागडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात देवेंद्र फडणवीस हे सातत्याने राज्यात दौरे करत होते. गेल्या सात महिन्यांत त्यांनी अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्याचबरोबर, अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणीसाठीही ते तीन दिवस दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांनी मला करोनाचा संसर्ग झाल्यास सरकारी रुग्णालयातच दाखल करा, असं गिरीश महाजन यांना म्हटलं होतं. फडणवीस यांनी म्हटल्या प्रमाणेच त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं फडणवीस यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागतही होत होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times