वाचा:
वास्तुविषारद यांच्या आत्महत्येप्रकरणी आज अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानातून अटक करण्यात आली. पोलिसांकडे अर्णब यांच्या अटकेसाठी रितसर वॉरंट होता आणि त्यानुसारच पोलिसांनी कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अर्णब यांना अटक करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अर्णब हे पोलिसांशी हुज्जत घालताना व अटकेस मनाई करताना दिसत आहेत. त्यात एका महिला पोलिसाचाही आवाज ऐकू येत आहे. त्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना एक तास घराबाहेर उभे करण्यात आले होते, असा उल्लेख आढळतो. ही बाब लक्षात घेता आता अटकेत असलेल्या अर्णब यांच्या अडचणी दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वाचा:
दरम्यान, अर्णब यांना अटकेनंतर थेट अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले होते. तिथे अर्णब यांच्या वकिलांनी पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी अटकेची कारवाई करताना मारहाण केली, असा आरोप अर्णब यांच्यावतीने करण्यात आला. दोन जणांनी मला मागून पकडले आणि दोन पोलिसांनी मला मारहाण केली. माझ्या मुलाला व कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा अर्णबच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला. हा आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण कारवाईचे चित्रण करण्यात आले आहे, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
वाचा:
अटक का झाली?
वास्तुविषारद अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी अलिबागमधील कावीर येथील त्यांच्या बंगल्यात मे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा या तिघांनी मिळून ५ कोटी ४० लाख रुपये थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नाईक यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले होते. याप्रकरणी तेव्हा अलिबाग पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गेल्यावर्षी या प्रकरणाची फाइल बंद करण्यात आली होती. त्यानंतर नाईक कुटुंबीय न्यायासाठी झगडत होतं. अन्वय नाईक यांची पत्नी व मुलगी सातत्याने याप्रकरणी चौकशीची मागणी करत होते. त्यात अन्वय यांची मुलगी आज्ञा हिने मे महिन्यात नव्याने तक्रार केली व त्याच आधारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिले. या चौकशीत ठोस माहिती हाती आल्याने पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times