म. टा. प्रतिनिधी, नागपूरः मेळघाट आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये आढळणार्‍या रानपिंगळा या वैशिष्ट्य़पूर्ण पक्ष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता पेंच व्याघ्र प्रकल्पात केला जाणार. पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या पक्षी सप्ताहांतर्गत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. याशिवाय पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या विविध क्षेत्रात आढळणार्‍या पक्ष्यांची माहितीही या सप्ताहादरम्यान संकलित केली जाणार आहे.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबर रोजी तर पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सालिम अली यांची जयंती १२ नोव्हेंबर रोजी असते. या दोन निसर्गअभ्यासकांच्या जन्मदिवसाचे निमित्त साधून पाच ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षीसप्ताह साजरा करण्याची घोषणा महाराष्ट्र वन विभागाने केली होती. या सप्ताहादरम्यान पक्ष्यांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाईल. विविध पक्षी अधिवास क्षेत्रांना या काळात भेट देण्यात येईल. पेंच व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या चोरबाहुली, पूर्व पेंच, कोलितमारा आणि सुरेवानी येथे पक्षीनिरीक्षण कार्यक्रम राबविला जाईल. प्रत्येक वनपरिक्षेत्र स्तरावर गाइड्सकरिता कार्यशाळा, पक्षीनिरीक्षण कार्यशाळा, ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्याकरिता पक्षीसंरक्षण आणि संवर्धन कार्यशाळा, क्षेत्रीय कर्मचार्‍यांसाठी पक्षीनिरीक्षण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here