वसई पूर्वेकडील वालीव नवजीवन नाका येथे राहणाऱ्या १८ वर्षीय हिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत फिरण्यासाठी गेली असता तिच्या भावाच्या मित्राने पाहिले व त्याला सांगितले. भावाने सर्व माहिती आई आणि वडिलांना सांगितली. मुलीला समजावून सांगूनसुद्धा ती न ऐकल्याने त्याच रागातून या तिघांनी रविवारी दुपारच्या सुमारास तिला रिक्षातून सुरुची बागेत फिरण्यास नेले. समुद्र किनाऱ्यावरील झाडाझुडुपांच्या ठिकाणी पोहोचल्यावर कोणी नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर तिच्या भावाने ओढणीच्या साहाय्याने गळ्याला फास लावून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती मृत झाल्याचे समजताच तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढला होता.
काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीच्या रडण्याच्या आवाजाने स्थानिक तिच्यापाशी पोहोचले. त्यांनी या तरुणीला तत्काळ सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यामध्ये तरुणीने सोमवारी शुद्धीवर आल्यानंतर दिलेल्या जबाबावरून तिचे आई, वडील आणि अल्पवयीन भावावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना तत्काळ अटकदेखील केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे वसईचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times