‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करून केंद्र सरकारने एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही विश्वासघात केला. भांडवलदारांच्या घशात शेती घालण्याच्या निर्णयाला संपूर्ण देशातून विरोध आहे. सरकारने तातडीने कृषी कायदे माघारी घेऊन शेतक-यांना किमान वैधानिक किमतीची हमी द्यावी,’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
‘संसदेत खासदारांचा विरोध असतानाही पाशवी बहुमताच्या बळावर भाजपने कृषी विधेयके मंजूर केली. शेतक-यांचे कल्याण करण्याच्या नावाखाली केलेल्या कायद्यांमुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही विश्वासघात केला आहे. भांडवलादारांना शेतीतून पैसा मिळावा, यासाठीच सरकारने नवे कायदे शेतक-यांवर लादले आहेत. येणा-या काळात धान्य खरेदीच्या जबाबदारीतून सरकार बाहेर पडणार. त्यानंतर खासगी कंपन्या भाव पाडून शेतीमाल खरेदी करणार आणि विक्री करताना भाव वाढवून ग्राहकांची लूट करणार आहेत.’ असंही ते म्हणाले आहेत.
‘ऊस दरासाठी किमान हमीभावाचा कायदा आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी नाही दिली तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते. त्याप्रमाणे सर्व शेतीमालासाठी किमान वैधानिक किंमत मिळालीच पाहिजे. हा भाव न देणा-यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. अशी तरतूद नवीन कायद्यांमध्ये केलेली नाही. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोघांचीही फसवणूक करणा-या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे, यामुळे केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीत अन्यायकारक कायदे रद्दच करावे लागतील,’ असे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times