राकेशचा लहान भाऊ सोनू सपकाळे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू हा रात्री सव्वा अकरा वाजता सलमान शेख युसूफ याच्यासोबत वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी दुचाकीने शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून जात होता. यावेळी विशाल व एक तरूण पाठीमागून दुचाकीने येत होते. त्यांना पुढे जाण्यासाठी साइड दिली नाही म्हणून त्यांनी वेगाने पुढे येत दुचाकी आडवी लावली. तर यानंतर आणखी एका दुचाकीवर गणेश सानवणे व दोन अनोळखी तरूण देखील तेथे पोहोचले. त्या तरुणांनी लाथ मारून सोनूची दुचाकी खाली पाडली. यांनतर गणेश याने हातातील तलवार सोनूच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. सोनूने डोक्यावरचा वार चुकवला. मात्र, हाताला दुखापत झाली. यानंतर सर्वांनी सोनूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. याचवेळी सोनूचा मोठा भाऊ राकेश व त्याचा मित्र सचिन लढ्ढा हे दोघे चारचाकीने घटनास्थळी पोहोचले. राकेशने सुरूवातीला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी गणेशने राकेशच्या मांडीवर तलवारीने वार केले. सोबत असलेल्या विशालने चॉपरने डोक्यात वार केले. या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाला होता. तसेच घटनास्थळी नागरिकांची गर्दी बघून मारेकरी दुचाकीवरुन पळून गेले.
यानंतर सोनूने दुचाकीने घरी जाऊन मोठा भाऊ राजू याच्यासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी येत जखमी राकेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. गुरुवारी पहाटे सोनू याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची पहाटेच्या सुमारास गणेश सोनवणे व विशाल यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर संशयित बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वाढदिवसाचा आनंद विरला…
राकेशचा मोठा भाऊ राजू उर्फ बाबु याचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याची तयारी राकेशने केली होती. परंतु, बुधवारी रात्री झालेल्या वादात त्याचा मृत्यू झाला. वाढदिवस साजरा करण्याऐवजी राकेशच्या मृत्यूने सपकाळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. वर्चस्व आणि टोळीयुद्धातून राकेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times