पक्षाच्या एका बैठकीसाठी माजी मंत्री शिंदे हे आज नगरला आले होते. यावेळी ते बोलत होते. ‘नगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या राज्यात सर्वात मोठा आहे. महाविकास आघाडीतील दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री हे नगर जिल्ह्यातील असून एक पालकमंत्री असे चार मंत्री नगरमध्ये आहेत. परंतु हे सरकार स्थापन झाल्यापासून या जिल्ह्यात जे लक्ष देणे आवश्यक होते, ते दिले गेले नाही. त्यामुळे करोना महामारीत लोकांना त्रास झाला. वैद्यकीय सेवा नीटनेटक्या उपलब्ध झाल्या नाहीत. प्रशासनाने काम केले, परंतु त्यांना देखील अडथळा आणण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी केले आहे. अतिवृष्टीने लोकांच्या पिकांचे नुकसान झाले, त्याचे पंचनामे व्यवस्थित झाले नाही. अशा प्रकारचे अनेक प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाले आहेत. जिल्ह्यामध्ये पालकमंत्री येत नाहीत. मी पालकमंत्री होतो, तेव्हा जिल्ह्यात सर्व तालुक्यात पोहोचत होतो. माझ्या कालखंडात केव्हाही पालकमंत्री विरोधात किंवा पालकमंत्री पोहोचले नाहीत, अशा तक्रारी आल्या नव्हत्या. मात्र नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सरकार मधील तीन मंत्री असताना देखील येथे बाहेरून कोल्हापूरचे मंत्री पालकमंत्री म्हणून नियुक्त केले गेले. त्यामुळे जिल्ह्याचा कार्यक्रम झाला असून कोणाचे कोठेच लक्ष नाही, अशी परिस्थिती आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, संगमनेर येथे एका पोलीस अधिकार्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याबाबत देखील शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीत काँग्रेस हा एक पक्ष असून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यातील मंत्री आहेत. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यात पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनात नेमके चाललंय काय ? त्यावर कोणाचे लक्ष आहे का नाही ? असे प्रश्नही निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा हे प्रश्न निर्माण झाला आहे. तरी थोरात यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times