दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिल्या क्वालिफायलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी विजय मिळवला आणि २०२०च्या फायनलमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजीकरत मुंबईने ५ बाद २०० धावा केल्या. बदल्यात दिल्ली कॅपिटल्सला ८ बाद १४३ इतक्याच धावा करता आल्या. या पराभवानंतर देखील दिल्लीला फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर २ मध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील विजेत्यासोबत होईल. मुंबईने सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएल २०२० मध्ये मुंबईने सलग तिसऱ्यांदा दिल्लीचा पराभव केलाय.

वाचा-

मुंबईने विजयासाठी दिलेल्या २०१ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने पहिल्या ४ ओव्हरमध्येच सामना गमावला. मुंबई इंडियन्सच्या घातक गोलंदाजी समोर दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांचे काहीही चालले नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉची विकेट घेतली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला शून्यावर बाद केले. दिल्लीची अवस्था पहिल्या ओव्हनंतर २ बाद शून्य अशी होती. पहिल्या ओव्हरच्या धक्क्यानंतर दिल्ली सावरेल असे वाटत होते. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रित बुमराहने दुसऱ्या चेंडूवर शिखर धवनची बोल्ड घेतली. तो दिल्लीने शून्यावर ३ विकेट गमावल्या होत्या. त्यांची पहिली धाव ९व्या चेंडूवर आली. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये बुमराहने पुन्हा एक धक्का दिला. त्याने कर्णधार श्रेयस अय्यरला १२ धावांवर बाद केले. दिल्लीची अवस्था ४ बाद २० अशी झाली होती.

मैदानावर असलेल्या ऋषभ पंत आणि मार्कस स्टायोनिस यांनी धावफलक हालता ठेवला. पण खराब फॉर्ममध्ये असलेल्या पंतला क्रुणाल पांड्याने बाद केले. दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिसने लढा दिला. त्याने ४६ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ६५ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ४३ धावा केल्या.

मुंबईकडून जसप्रित बुमराहने ४ षटकात १४ धावा देत ४ विकेट घेतल्या. तर बोल्टने दोन विकेट घेतल्या.

वाचा-

त्याआधी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरूवात केली. डीकॉकने पहिल्याच ओव्हरमध्ये १५ धावासह धमाकेदार सुरूवात करून दिली. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये आर अश्विनने पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माला शून्यावर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि डी कॉक यांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. त्यांनी ५ षटकात ५२ धावापर्यंत मजल मारून दिली. आठव्या षटकात अश्विनने संघाला दुसरी विकेट मिळून दिली. त्याने डी कॉकला ४० (२५ चेंडू) धावांवर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमारने सर्व सूत्रे हाती घेतली. त्याने इशान किशन सोबत संघाला शतकापर्यंत मजल मारून दिली. सूर्यकुमारने ३६ चेंडूत ५० धावा करत अर्धशतक केले. पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. सूर्यकुमारने आयपीएलच्या सलग दुसऱ्या क्वालिफायल लढतीत अर्धशतक झळकावले आहे. याआधी त्याने २०१९ मध्ये चेन्नईविरुद्ध नाबाद ७१ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर आलेल्या कायरॉन पोलार्ड शून्यावर बाद झाला.

वाचा-

पोलार्डच्या जागी आलेल्या क्रुणाल पांड्याने १० चेंडूत १३ धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा मुंबईची अवस्था ५ बाद १४० अशी होती. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने इशान किशनसोबत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. मुंबईने अखेरच्या पाच ओव्हरमध्ये ९२ धावा केल्या. यामुळे मुंबईने ५ बाद २०० धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. तर इशान किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि ४ चौकार मारले.

वाचा-

मुंबईची सुरूवात धमाकेदार झाली होती. पण मधल्या ओव्हरमध्ये धावांची गती कमी झाली होती. पण अखेरच्या काही षटकात इशान किशन आणि हार्दिकने धमाकेदार फलंदाजी केली. दिल्लीकडून आर अश्विनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here