कल्याण पूर्वेतील परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीत मेहजबीन हबीद अन्सारी यांचे झोपडीवजा घर असून त्यांच्या बाजूलाच राहणाऱ्या टिंकू मंडलला हे घर हवे आहे. यातून दोन कुटुंबात मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. गुरुवारी दुपारी घराबाहेर खेळणाऱ्या मुलांमध्ये वाद झाल्यानंतर मेहजबीन अन्सारी जाब विचारण्यासाठी टिंकू मंडलच्या घरी गेली. त्यावेळी दोघांमध्ये झाली. यानंतर टिंकूने मेहजबीन हिच्या अंगावर अॅसिड फेकल्याने ती गंभीररित्या भाजली आहे. तर अॅसिड फेकताना ते हातावर उडाल्याने टिंकूदेखील भाजला आहे. हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या डोंगरे नावाच्या एका इसमाच्या अंगावरदेखील हे अॅसिड उडाल्याने तो देखील थोडाफार भाजला आहे. या तिघांनाही उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरात अॅसिड बाळगून अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी टिंकू आणि त्याची पत्नी रेणू या दोघांनाही तत्काळ अटक केली. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times