म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सर्वाधिक अपघात घडणाऱ्या भागातील अपघातग्रस्तांची वैद्यकीय उपचारांसाठी परवड होत असल्याचे दिसून आले आहे. बोरघाट ते खालापूर या रस्त्यावर अधिक अपघात होत असून, येथे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ची सुविधा नसल्याने अपघातातील जखमींना उपचारांसाठी पनवेल गाठावे लागत आहे.

‘मृत्यूचा महामार्ग’ अशी ओळख बनलेल्या एक्स्प्रेस-वेवर २०१९मध्ये ७३ अपघातांत ९७ जणांचा मृत्यू झाला. २०१८मध्ये ९६ अपघातांत ११० जणांना प्राण गमवावा लागला होता. गेल्या वर्षात अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, घटत्या अपघातांबरोबरच आणखी एक चिंतेची बाब समोर आली असून, ‘गोल्डन अवर्स’मध्ये उपचार मिळविण्यासाठी अपघातग्रस्तांची परवड होत आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास एक्स्प्रेस-वेची विभागणी घाट क्षेत्र, घाटाखालील भाग (मुंबईकडील) आणि घाटावरील भाग (पुण्याकडील) अशी तीन भागात होते. यामध्ये सर्वाधिक अपघात हे घाट क्षेत्रात आणि घाटाखालील भागात झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

एक्स्प्रेस-वेवर गेल्या वर्षात एकूण ३५२ अपघात झाले. त्यामध्ये ७३ प्राणांतिक अपघातांचा समावेश असून, पैकी ५४ अपघात रायगड आणि नवी मुंबईच्या हद्दीत झाले आहेत. ६८ गंभीर अपघात झाले असून, त्यापैकी ४१ अपघात रायगड, नवी मुंबईत झाले आहेत. यावरून निम्म्याहून अधिक अपघात घाटाखालील भागात होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी पनवेलला हलवावे लागत असल्याने वेळ वाया जात आहे.

एक्स्प्रेस-वेवर अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ओझर्डे येथे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. उभारणीनंतर जवळपास तीन ते चार वर्षांनी ते कार्यान्वित झाले. मात्र, आता घाट क्षेत्र आणि मुंबईकडील भागात अधिक अपघात होत असल्याने तेथेही खालापूरनजीक ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू करण्याची आवश्यकता आहे.

जखमींना ‘एमजीएम’चा पर्याय
खोपोली, खालापूर किंवा नवी मुंबईच्या हद्दीत अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी ‘एमजीएम’ हॉस्पिटलचाच एकमेव पर्याय आहे. अपघातानंतर जखमींना प्रत्यक्ष घटनास्थळी मदत मिळेपर्यंत आणि तेथून हॉस्पिटला पोहोचेपर्यंतचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. जखमींना जागच्या जागी उपचार मिळाल्यास ते वाचण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षात रायगड जिल्ह्यात प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली. दुसरे ट्रॉमा केअर सेंटर खालापूर येथे उभारणे शक्य आहे. त्या ठिकाणी ट्रक टर्मिनलची जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी ते युनिट उभारणे व्यवहार्य ठरेल.

तन्मय पेंडसे, वाहतूक अभ्यासक

………..

२०१९मध्ये एक्स्प्रेस वेवर झालेले अपघात
तपशील नवी मुंबई रायगड पुणे ग्रामीण पिंपरी-चिंचवड

प्राणांतिक अपघात ११ ३३ २६ ३

मृतांची संख्या ११ ४९ ३३ ४

गंभीर अपघात १० ३१ १७ १०

गंभीर जखमी २४ ७५ ४१ ३४

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here