मनीष हर्षे हे आरपीआयचे कार्यकर्ते असून बोरिवलीच्या गोराई परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी दिल्ली येथील एका बँकेत उच्च पदस्थ अधिकारी आहे. मंगळवारी दुपारी ते इमारतीच्या प्रवेशद्वारावर गप्पा मारत असताना दोघेजण या ठिकाणी आले आणि रिक्षात जबरदस्तीने हर्षे यांना कोंबून घेऊन गेले. बराच उशीर घरी न आल्याने हर्षे यांच्या पत्नीने मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो बंद येत होता. प्रवेशद्वारावर येऊन सुरक्षारक्षकाकडे चौकशी केली असता ते रिक्षातून गेल्याचे सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना दोघे तरुण त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवत असल्याचे दिसले. हर्षे यांच्या पत्नीने बोरिवली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. अपहरण असल्याने गुन्हे शाखा युनिट ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रईस शेख, सलील भोसले, सहायक निरीक्षक शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील यांच्यासह पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध सुरु केला.
सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा तसेच तांत्रिक पुराव्यांवरून अपहरण करणारे नाशिकच्या दिशेने गेल्याचे लक्षात आले. पोलीस नाशिकच्या दिशेने रवाना झाले. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच ते अहमदनगरच्या दिशेने गेले. दरम्यान, पोलिसांनी आणि या दोघांना संगमनेर येथून शोधून काढले. हे दोघेही हर्षे यांच्या परिचयातील असून जुन्या भांडणाचा राग काढण्यासाठी त्यांनी अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. रिक्षात हर्षे यांना दारू पाजून कळवा खाडी पुलावरून खाली फेकल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानुसार पोलीस आता हर्षे यांचा शोध घेत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times