आरसीबीच्या १३२ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादला यावेळी पहिल्याच षटकात धक्का बसला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यावेळी हैदराबादच्या श्रीवत्स गोस्वामीला बाद केले. गोस्वामीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
गोस्वामी बाद झाल्यावर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची जोडी चागंली जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. ही जोडी मोठी धावसंख्या रचेल, असे वाटत होते. पण सिराजने पुन्हा एकदा आरसीबीला यश मिळवून दिले. सिराजने यावेळी वॉर्नरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नर बाद आहे की नाही, यावर चांगलाच वाद रंगला होता. पण तिसऱ्या पंचांनी यावेळी वॉर्नरला बाद ठरवले आणि हैदराबादला मोठा धक्का बसला. वॉर्नरने यावेळी १७ धावा केल्या.
वॉर्नर बाद झाल्यावर काही वेळातच पांडेही बाद झाला. त्यामुळे हैदराबादला थोड्या कालावधीत हे दोन महत्वाचे धक्के बसले. पांडेने यावेळी २४ धावा केल्या. वॉर्नर आणि पांडे हे दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले असले तरी केन विल्यम्सन हा खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. केनने यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत होता. केनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादचे आव्हान टिकून होते. केनने यावेळी दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५० धावांची दमदार खेळी साकारली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times