पोलीस दलातील बदल्यांच्या मुद्द्यावरून जयस्वाल यांचे राज्य सरकारसोबत मतभेद होते. नक्षलग्रस्त भागातील नियुक्त्यांवरूनही त्यांचे सरकारशी जमले नाही. त्यामुळं त्यांनी स्वत:हून केंद्र सरकारच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. तशी विनंती त्यांनी ठाकरे सरकारकडे केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. महासंचालक पद रिक्त होणार असल्यानं राज्यात आता पुन्हा एकदा बदल्या होण्याची चिन्हं आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या घडामोडींवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
‘जयस्वाल हे केंद्र सरकारच्या सेवेत जात असल्याची बातमी धक्कादायक आणि दुःखद आहे. राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे जैस्वाल यांच्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी दुखावले आहेत. पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी जयस्वाल यंनी केलेल्या सर्व सूचना आणि उपाययोजना सरकार धुडकावून लावत होते. याशिवाय त्यांच्या शिफारशींच्या विरुद्ध पूर्वीच्या निलंबित पोलिसांना पुन्हा पदावर घेण्यात आले होते. या महाभकास आघाडीच्या सरकारनं सर्व नियम बाजूला सारून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. बहिरं आणि कुचकामी असं हे सरकार आहे,’ असा आरोप पाटील यांनी केला.
‘जयस्वाल यांनी भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’मध्ये काम केले होते. २०१८ साली त्यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला होता. असा सक्षम अधिकारी राज्यातून जाणे हे घातक आहे,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे. जयस्वाल यांची वर्णी एनएसजीच्या प्रमुख पदी लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times