विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही गरोदर आहे. त्यामुळे कोहलीच्या घरी जानेवारी महिन्यामध्ये पाळणा हलणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांमध्ये कोहली खेळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता कोहली दोन कसोटी सामने खेळणार नसताना संघाचे कर्णधारपद कोण भूषवणार, याची चर्चा सुरु झाली आहे. ‘कोहली जानेवारीमध्ये बाबा होणार आहे, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दोन कसोटी सामने खेळता येणार नाहीत,’ असे सूत्रांनी यावेळी सांगितले आहे.
कसोटी संघातचे उपकर्णधारपद सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणेकडे आहे. त्यामुळे जर कोहली दोन कसोटी सामने खेळणार नसेल तर त्यावेळी अजिंक्यकडे संघाचे कर्णधारपद द्यायला हवे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघात वेगळेच वारे वाहत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या संघ निवडीच्यावेळी आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्यामुळे भारतीय संघातील चित्र सध्याच्या घडीला आलबेल असल्याचे दिसत नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत १७ डिसेंबरला सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना अॅडलेड येथे १७ डिसेंबरपासून रंगणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणार आहे. तिसरा कसोटी सामना ७ जानेवारी २०२१ या दिवशी सिडनी येथे सुरु होणार आहे, तर मालिकेतील अखेरचा आणि चौथा कसोटी सामना १५ जानेवारीला ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. कोहलीच्या घरी जानेवारी महिन्यात पाळणा हलणार असल्यामुळे तो सिडनी आणि ब्रिस्बेन या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times