म.टा.प्रतिनिधी, नगरः पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याकडील तब्बल २ लाख ७० हजार रुपये चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये माळीवाडा परिसरात घडला आहे. ५ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात काल, शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर शहरातील माळीवाडा भागातील कोहिनूर गार्डन परिसरात प्रसन्नकुमार नहार हे राहतात. नहार यांचे मार्केटयार्ड परिसरात दुकान आहे. आपले दुकान बंद करून ते ५ नोव्हेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास घरी निघाले. यावेळी त्यांनी दुकानातून पैशाची बॅग घेऊन ती आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली. या बॅगमध्ये २ लाख ७० हजार रुपये होते. कोहिनूर गार्डन परिसरातील आपल्या घऱाजवळ आल्यानंतर नहार यांनी आपली दुचाकी पार्किंग करून त्यामधून पैशाची बॅग काढली.

त्यानंतर ती बॅग घेऊन ते आपल्या घराकडे निघाले. त्याचवेळी तेथे दुचाकीवर दोन अनोळखी व्यक्ती आल्या. यापैकी एक व्यक्ती नहार यांना म्हणाली, ‘हमे कृष्णा अपार्टमेंट को जाना है, रस्ता बोलो,’ आणि त्याचवेळी दुचाकीवर असणाऱ्या व्यक्तींनी नहार यांच्या हातामधील पैशाची बॅग ओढली, व ती घेऊन तेथून पळ काढला. याबाबत नहार यांनी पोलिसात तक्रार दिली असून त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक भंगाळे पुढील तपास करीत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here