बायडन यांचा पावसातील सभेचा फोटोवरही पवार यांनी त्यावेळी सूचक ट्विट केलं होतं. या दोन्ही निवडणुका सुरू असताना पवार यांनी वेळोवेळी भाष्य केलं होतं. बिहारमधील प्रचार शिगेला पोहचला असताना त्यांनी ही निवडणूक जातीयवादाच्या बाहेर जाऊन रोजगाराच्या मुद्द्यावर आल्याचं म्हटलं होतं. याचं श्रेय त्यांनी तेथील युवा आणि निवडणुकीत हा मुद्दा घेऊन उतरलेल्या विरोधकांना दिलं होतं. आता एक्सिट पोल पुढे आल्यानंतर पवार यांनी पुन्हा एकदा यासंबंधी मत व्यक्त केलंय.
बहुतांश एक्सिट पोलवरून बिहारमध्ये सत्तांतर होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर पवार यांनी म्हटलं आहे की, ‘बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा.’
असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
त्या आधी अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात विजयी झालेल्याबद्दल बायडन यांचं पवार यांनी अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘अमेरिकेतील हेकखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, अशी अपेक्षा,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
प्रचार सुरू असताना बायडन यांचा पावसातील भाषणाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळीही पवार यांनी तो ट्विट करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण करून दिली होती. आता अभिनंदनाचं ट्विट करताना पवार यांनी आपल्या त्या ट्विटचीही आठवण करून दिली आहे. त्यामध्ये पवार यांनी म्हटलं होतं, ‘जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे!’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times