इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून ते अलिबागमधील एका पालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आज, रविवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. अलिबागमध्ये न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी मोबाइलचा वापर केल्याचा आरोप आहे.
रायगड क्राइम ब्रँचचे तपास अधिकारी जमिल शेख यांनी सांगितले की, गोस्वामी हे कोठडीत असताना शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याची माहिती मिळाली. ते मोबाइल फोनचा वापर करत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी त्यांना अटक केली त्यावेळी त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला होता. आम्ही तातडीने अलिबागमधील तुरुंग अधीक्षकांना यासंबंधी पत्र लिहिले. गोस्वामी यांच्याकडे मोबाइल फोन आला कुठून याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.
माझ्या जीवाला धोका; अर्णब यांचा दावा
गोस्वामी यांना रविवारी सकाळी तळोजा कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला. पोलीस व्हॅनमध्ये ते जोरजोरात ओरडून मारहाण झाल्याचे सांगत होते. मला जबरदस्ती तळोजा कारागृहात नेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. ‘माझ्या जीवाला धोका आहे. कोर्टाला सांगा की मला मदत करा,’ असे ते व्हॅनमध्ये असताना ओरडून सांगत होते. मला वकिलांना भेटायचे आहे असे सांगितले तर, तुरुंग अधीक्षकांकडून मला मारहाण करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times