राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही करोनाने गाठले होते. आठवले यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाली होती. आठवले व त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात २७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिथे १२ दिवसांच्या उपचारानंतर दोघेही पूर्णपणे बरे झाले आहेत. दोघांच्याही करोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले.
आठवले यांचे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निवासस्थानाबाहेर जंगी स्वागत केले. आठवले यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. या स्वागताबद्दल आठवले यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आठवले यांनी करोनामुक्त झाल्यानंतर ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मी घरी परतलो आहे. माझे स्नेहपूर्वक स्वागत केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या स्वास्थ्यासाठी जे शुभचिंतक, कार्यकर्ते यांनी प्रार्थना केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. रुग्णालयाचे डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो’, असे ट्वीट आठवले यांनी केले आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांची प्रकृती आता उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील काही दिवस होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.
‘गो करोना गो’वाला व्हिडिओ झाला होता व्हायरल
करोनाची साथ पसरू लागल्यानंतर रामदास आठवले हे गेट वे ऑफ इंडिया येथील एका व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. आठवले यांनी आपल्या खास शैलीत ‘गो करोना गो’ अशा घोषणा दिल्या होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियात त्यावर अनेक मीम्सही तयार करण्यात आले होते. पण ‘गो करोना गो’ म्हणणाऱ्या आठवले यांनाच करोनाने गाठल्याने त्यांचे कार्यकर्ते गेले काही दिवस चिंतेत होते. या संकटावर आता आठवले यांनी यशस्वीपणे मात केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला आज पारावर उरले नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times