आबुधाबी: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आजच्या क्वालिफायर-२ या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर १७ धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर १० नोव्हेंबरला होणार आहे. दिल्लीच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलगा करताना हैदराबादच्या केन विल्यम्सनने एकाकी झुंज दिली. केनने यावेळी अर्धशतक झळकावले खरे, पण त्याला हैदराबादला विजय मिळवून देता आला नाही.

दिल्लीच्या संघाने हैदराबादपुढे १९० धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने यावेळी हैदराबादचा कर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या षटकातच त्रिफळाचीत केले. हैदराबादसाठी हा मोठा धक्का होता. वॉर्नरला यावेळी फक्त दोन धावांवर समाधान मानावे लागले.

वॉर्नर बाद झाल्यावर प्रियम गर्ग आणि मनीष पांडे यांची काही काळ चांगली भागीदारी पहायला मिळाली. पण दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने आपल्या पहिल्याच षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. मार्कसने प्रियमला आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. प्रियमला यावेळी १७ धावा करात आल्या. त्यानंतर मार्कसने या षटकातील सहाव्या चेंडूवर मनीषलाही बाद केले आणि हैदराबादला दुहेरी धक्के दिले. मनीषला यावेळी २१ धावा करता आल्या.

हैदराबादला दोन धक्के एकाच षटकात बसले असले तरी हैदराबादचा डाव यावेळी सावरला तो केन विल्यम्सनने. गेल्य सामन्यातही केनने अर्धशतक झळकावले होते आणि संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यातही केनने हैदराबादचा डाव सावरत अर्धशतक झळकावले. पण यावेळी जेसन होल्डरची चांगली साथ त्याला मिळाली नाही. गेल्या सामन्यात या दोघांनीच हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. पण यावेळी होल्डरला अक्षर पटेलने बाद केले. होल्डरला यावेळी ११ धावा करता आल्या.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने यावेळी अर्धशतक झळकावत हैदराबादच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. धवनने यावेळी धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळेच दिल्लीला हैदराबादपुढे १९० धावांचे मोठे आव्हान ठेवता आले. शिखर धवनने यावेळी ५० चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ७८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here