‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारने चित्रपटगृहे, तसेच सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर कलाकारांच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कोविड-१९ संदर्भातील नियमांचे पालन करून ५ नोव्हेंबरपासून नियंत्रित स्वरूपात कार्यक्रमांना परवानगी मिळाली आहे. मात्र, एकीकडे ही परवानगी देताना दुसरीकडे दिवाळीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असेही म्हटले आहे. नाटक आणि इतर कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीसह परवानगी दिलेली असताना, दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांवर ऑनलाइनचे निर्बध कशासाठी, असा प्रश्नही यामुळे विचारण्यात येत आहे.

सुमारे आठ महिन्यांचा कालावधी करोनाशी आणि आर्थिक अडचणींशी सामना केल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने रंगभूमी, चित्रपटक्षेत्र, दिवाळी अंक या परंपरा पुनरुज्जीवित करत आहोत, मग केवळ दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांचे राज्य सरकारला वावडे का? अशी चर्चा सादर करणाऱ्या कलाकारांसह आयोजकांमध्येही सुरू झाली आहे. नाटक आणि दिवाळी पहाट या दोन कार्यक्रमांच्या सादरीकरणामध्ये फरक करून लोकांसमोर जिवंत कला सादरीकरणाची आणि अर्थातच या निमित्ताने पुन्हा एकदा अर्थचक्र सुरू करण्याची संधी का नाकारली जात आहे?, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजक मंदार कर्णिक यांनी नाट्यगृहे सुरू होणार या निर्णयासंदर्भात कळल्यानंतर दिवाळी पहाट कार्यक्रमाची तयारी सुरू केली. मात्र, या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी जाताना त्यांना कळले की दिवाळी पहाट कार्यक्रमांना मात्र परवानगी नाही. ही परवानगी का नाही? याचा खुलासा स्पष्ट नसल्याने दिवाळी पहाटला हरकत असेल, तर मग दिवाळी संध्या कार्यक्रम चालेल का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. नाटकांना परवानगी देताना दिवाळी पहाटेचे कार्यक्रम वेगळे कसे ठरतात हे कळत नसल्याचेही ते म्हणाले.

आयोजक अशोक हांडे यांनीही दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी नाकारताना नेमका काय विचार केला आहे, हे कळत नसल्याचे सांगितले. मार्गदर्शक तत्त्व पाळणे महत्त्वाचे आहे. मात्र, दिवाळी पहाटेचे कार्यक्रम नाकारण्याचे कारण काय हे कळत नसल्याने गोंधळाची स्थिती असल्याचे सांगितले. मात्र, यावर सध्या कारण न कळल्याने प्रतिक्रियाही देता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

नाट्यगृहांसंदर्भातील निर्णयानंतर सांगीतिक कार्यक्रम आयोजकांनी दिवाळीसाठी तयारीही सुरू केली. मात्र, हा उत्साह दिवाळीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांमुळे लगेचच मावळला, अशी भावना आयोजिक प्रसाद महाडकर यांनी व्यक्त केली. नाट्यगृहांमध्ये चौकशी केल्यावर अजून नेमक्या कशा पद्धतीने कार्यक्रम करायचे याची स्पष्टता नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, नाटकांप्रमाणेच ५० टक्के प्रेक्षकांसह दिवाळी पहाटेचे कार्यक्रमही आयोजित करता आले असते असेही मत त्यांनी मांडले.

राज्य सरकारने नाटकांना परवानगी देताना, त्याच वेळी दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याने दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमाला येणारा रसिकवर्ग वेगळा असतो, तो सूचना पाळणार नाही असा विचार केला आहे का? अशी नाराजी रसिकांमधूनही व्यक्त होते आहे. दिवाळी पहाटेचे कार्यक्रम नाट्यगृहांना दिलेल्या परवानगीनंतर एका आठवड्याने होणार होते. यासंदर्भातील निर्बंधाचा फेरविचार करून हा दिवाळीमध्ये संगीतरसिकांना केवळ ऑनलाइन कार्यक्रमांवर समाधान मानावे लागू नये या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here