म. टा. प्रतिनिधी, सांगली: जबरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार अजय बापू कांबळे (वय २३, रा. राजीव गांधी नगर, झोपडपट्टी) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी (ता. ८) सकाळी सापळा रचून जेरबंद केले. अधिक तपासात त्याचे साथीदार बापू उर्फ विश्वनाथ दिलीप काळे (वय ३०) आणि आकाश संतोष जाधव (३०, दोघेही रा. वाल्मिकी आवास) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आणि जिल्ह्यातील नऊ गुन्ह्यांची उकल झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात १४ गुन्हे दाखल आहेत. तीन महिन्यांपूर्वी वाल्मिकी आवास घरकुल परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पंडित पुजारी (२३) याच्यावर खुनी हल्ला केल्यानंतर कांबळे पळून गेला होता. चोरीतील सोन्याची वाटणी करण्याच्या वादातून त्याने राकेश पुजारी याच्यावर हल्ला केला होता. रविवारी सकाळी तो भारती हॉस्पिटलजवळ आल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. यानंतर केलेल्या चौकशीत विश्वनाथ काळे आणि आकाश जाधव हे त्याचे दोन साथीदारही सांगलीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांना दोन्ही साथीदारांना अटक केली. हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.

अटकेतील तिघांच्या चौकशीतून घरफोड्या आणि जबरी चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले. सांगली शहर, ग्रामीण, मिरज ग्रामीण, कुपवाड यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर आणि शिरोली पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. संशयितांकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here