म. टा. प्रतिनिधी, : सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांचे कोणतेही भय राहिले नसून दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी खेचल्याने दुचाकीवरून पडून ही महिला जखमी झाल्याची घटना भिवंडीमध्ये घडली. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना आळा बसणार कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सरोजा शामल (६० वर्ष) असे या जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्या भिवंडीतील पद्मानगर भागात राहतात. त्या येथील मानसरोवर भागातील नातेवाईक किशोर कोलीपाका यांच्या घरी आल्या होत्या. शुक्रवारी रात्री शामल आपल्या घरी जाण्यासाठी किशोर यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जात होत्या. १० वाजून ५० मिनिटांनी मानसरोवर रस्त्यावरील श्रमिकनगर याठिकाणी त्यांची दुचाकी आल्यानंतर डाव्या बाजूने आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी शामल यांच्या गळ्यातील दोन सोनसाखळ्या खेचल्या. दुचाकीवरून खाली तोंडावर पडल्याने कपाळ, उजवा खांदा आणि डाव्या मनगटास मार लागल्याने शामल जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्धवट तुटलेल्या सोनसाखळ्या घेऊन चोरटे पसार झाले असून या दागिन्यांची किंमत ८७ हजार रु आहे. किशोर यांच्या तक्रारीनंतर अनोळखी चोरट्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे २५ ते ३० वर्ष वयोगटातील होते.

दरम्यान, जखमी शामल यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद वाढल्याचे दिसत आहे. हातातील मोबाइलही चोरटे हिसकावत असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. आरोपी सापडत नसल्याने हे चोरटे वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करत आहेत. रस्त्यावरून पायी चालणेच नव्हे तर आता दुचाकीवरून जाणेही अवघड झाल्याने चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सोनसाखळी चोरीच्या घटना

-सावरकरनगर परिसरात महिलेच्या गळ्यातील चोरट्याने सोनसाखळी खेचली

-घोडबंदर भागात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी झटका देऊन खेचली

-डोंबिवलीतील महात्मा फुले रोडवर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले

-लुईसवाडीतील (ठाणे) साईनाथनगरमध्ये राहणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र खेचले

-तुळशीधाम (ठाणे) सिग्नलकडून तत्त्वज्ञान विद्यापीठ येथे रिक्षातून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले

-९ ऑक्टोबरला बाळकुम नाका येथे तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. आरोपीला अटक

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here