यापूर्वी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट अकांउट काढून पैसे मागण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर एका फौजदाराबाबत आणि गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षकाबाबतही असाच प्रकार घडला आहे. या सर्व प्रकारांत आतापर्यंत केवळ गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोटो मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ बनविण्यात आला आहे. त्यानंतर बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून तो संबंधित पोलिसाच्या फ्रेंडलिस्टमधील अनेकांना पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. त्यानंतर काही नागरिकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याशी संपर्क साधून याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तसेच, संबंधित पोलिसाने त्याच्या फेसबुक अकाउंटवरूनच सर्वांना असा प्रकार घडल्याची माहिती देऊन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
फेसबुकवरील फोटो आणि माहिती घेऊन बनावट अकाउंट तयार केले जात आहे. त्यानंतर मूळ फेसबुक अकाउंटवरील फ्रेंडलिस्टमधील सर्वांना नव्याने सुरू करण्यात आलेल्या बनावट अकांउटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. हे केल्यावर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जात आहे. बऱ्याच वेळा पैसे मागण्यासाठी हिंदी भाषेतून संवाद साधला जात असल्याचे आढळून आले आहे. तर, काहींना इंग्रजीमधून मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांच्या नावाने बनावट अकाउंट काढून पैसे मागण्यात आले होते. त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी बनावट अकांउट बंद केले. पण त्यानंतर एका फौजदाराच्या नावाने; तर काही दिवसांतच गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या सहायक निरीक्षकाच्या नावाने पैसे मागितल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांच्या बाबत असे प्रकार सातत्याने घडत असल्याने सोशल मीडियावरील माहितीचा गैरवापर रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
अशी घ्या खबरदारी
> फेसबुकच्या अकांउट सेटिंगमधून प्रायव्हेसी सेटिंगमध्ये आवश्यक बदल करा.
> फेसबुकवर तुम्ही अपलोड केलेले फोटो, व्हिडिओ आणि अन्य माहिती कोणाकोणाला दिसायला हवी याबाबतही सेटिंग करा.
> प्रोफाइल सेटिंगमध्ये ‘फ्रेंन्ड्स ओन्ली’ सेटिंग करता येऊ शकते. त्याबाबतची माहिती सेटिंग ऑप्शनमध्ये दिलेली असते.
> शक्यतो अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
> स्वतःची अथवा कुटुंबाची अतिरिक्त माहिती, फोटो, व्हिडिओ सातत्याने अपलोड करणे टाळा.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times