म. टा. प्रतिनिधी, सांगली: हरणाच्या शिंगांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. योगेश श्रीपती रानगले (वय २१) आणि अनिकेत संजय गावडे (वय २५, दोघेही रा. पंचशील नगर, सांगली) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. रविवारी (ता. ७) रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. यांच्याकडून पोलिसांनी चार शिंगे जप्त केली असून, शिंगे कुठून आणली याचा तपास सुरू आहे.

सांगली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा सांगली बायपास रोडवर न्यू प्राइड मल्टिप्लेक्सजवळ काही तरूण हरणांच्या शिंगांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सांगली बायपास रोडवर सापळा रचला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून दोन तरुण न्यू प्राइड मल्टिप्लेक्सजवळ येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयित वाटताच पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. यातील एकाकडे असलेल्या पिशवीबाबत विचारण केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. झडती घेतल्यानंतर पिशवीत हरणांची चार शिंगे आढळून आली. विक्रीसाठी शिंगे घेऊन आल्याची त्यांनी कबुली दिली. योगेश रानगले आणि अनिकेत गावडे या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील चार शिंगे जप्त केली आहेत.

सांगलीत यापूर्वीही अनेकदा हरणांच्या शिंगांची आणि विक्रीचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे करून त्यांची शिंगे, कातडी यांची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे. अटकेतील दोघांनी शिंगे कोणाकडून आणली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच खरेदी करणारे कोण होते, याचाही शोध घेतला जात आहे. यातून वन्यजिवांच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here