म. टा. प्रतिनिधी, नगर: एखाद्या दुकानात जाऊन वस्तूची खरेदी करायची. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून दुकानात लावण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करायचा व एका अँड्रॉइड ॲपचा वापर करत ऑनलाइन पेमेंट केल्याचा खोटा एसएमएस पाठवून लाखोंची करणाऱ्या टोळीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता ( सर्व रा. भोसरी, पुणे) या चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.

नगर-सोलापूर रोडवर सिद्धी पेट्रोल पंप येथे ८ नोव्हेंबरला एका कारमधून चार जण आले. त्यांनी या कारमध्ये तीन हजार रुपयांचे पेट्रोल भरले. तसेच ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून पेट्रोल पंपावरील क्युआर कोड स्कॅन केला. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट झाल्याचा मेसेज पेट्रोल पंपावर असणाऱ्या व्यवस्थापकाला दाखवला. त्यानंतर हे चौघे भरधाव कारमधून निघून गेले. पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक प्रमोद खरे यांनी पेट्रोल पंपाचे खाते चेक केले असता, तीन हजार रुपये जमा झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित कारमधील व्यक्तीने खोटा एसएमएस दाखवून फसवणूक केल्याचे लक्षात येताच, व्यवस्थापक खरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, ‘दरेवाडी शिवारात संबंधित गुन्ह्यातील आरोपी फिरत आहेत. या माहितीची खात्री करत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दरेवाडी परिसरात गेले. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेली ती कार पोलिसांना दरेवाडी भागात दिसली. या कारला घेराव घालून पोलिसांनी आरोपी संजय सोनार, शुभम सोनवणे, रवी पटेल, राजू गुप्ता यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने केला जातो, याची माहिती पोलिसांना दिली. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन दिवसांमध्ये रांजणगाव गणपती येथे एका फुटवेअरमध्ये, नगर शहरातील माळीवाडा भागात एका मोबाइलच्या दुकानात, पुणे जिल्ह्यातील कारेगाव भागात एका मोबाइलच्या दुकानात अशाच पद्धतीने खरेदी केल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून फसवणूक करून चोरी केलेले दोन मोबाइल, विविध कंपन्यांचे बूट व सॅंडल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार असा एकूण २ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्यासह त्यांच्या पथकातील सुनील चव्हाण, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश सातपुते , प्रकाश वाघ, मेघराज कोल्हे यांनी ही कारवाई केली आहे.

अशी केली जात होती फसवणूक

आरोपी हे दुकानात गेल्यानंतर एखाद्या वस्तूची खरेदी करायचे. त्यानंतर दुकानदाराला ऑनलाइन पेमेंट करतो , असे आरोपी सांगायचे. दुकानात लावलेला क्युआर कोड स्कॅन करायचे. क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर त्यामधून आरोपी हे त्या दुकानदाराचा मोबाइल नंबर मिळवत होते व या मोबाइल नंबरवर एका अँड्रॉइड ॲपचा वापर करून बल्क एसएमएस पाठवत होते. हा एसएमएस दुकान मिळाल्यानंतर दुकानदाराला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, असे वाटत होते. त्यामुळे दुकानदार आरोपींना दुकानातून जाण्याची परवानगी देत होते. प्रत्यक्षात मात्र वस्तूच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचे पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा होत नव्हते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here