म. टा. प्रतिनिधी, सांगलीः आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे चोरट्यांनी आदिती ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानातील १८ लाख ३६ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी (ता. ९) सकाळी उघडकीस आला. याबाबत ज्वेलर्सचे मालक बाबू हणमंत जगताप (वय ३५, रा. राजेवाडी, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, फिल्मी स्टाईलने झालेल्या चोरीमुळे दिघंची परिसरात खळबळ उडाली आहे.

आटपाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबू जगताप यांचे दिघंची येथे मायणी रोडला विटा मर्चंट बँकेसमोरच्या इमारतीत आदिती ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दुकानात आल्यानंतर त्यांना मागील भिंतीला भगदाड पडल्याचे दिसले. दुकानातील सोने आणि चांदीचे दागिनेही अज्ञाताने लंपास केल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने आटपाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक बोलवले. दुकानामागील झुडपांमध्येच श्वान घुटमळले. ठसे तज्ज्ञांनीही दुकानातील वस्तूंवरील हातांचे ठसे घेतले आहेत.

चोरट्यांनी दुकानाची मागील भिंत फोडून आत प्रवेश केला. दुकानातील १८ लाख ३६ हजार १८८ रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, फिल्मी स्टाइलने झालेल्या या चोरीमुळे दिघांची परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आटपाडी तालुक्यात किरकोळ चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. आता ज्वेलर्स लुटीच्या घटनाही घडू लागल्याने नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here