मुंबई: ‘चुका मान्य करून पुढे जाणे हीच नेतृत्वाची धमक असते. पण चुकांचे समर्थन करणे ही नवी राजकीय परंपरा बनू लागली आहे. अमेरिकेत नेमके हेच करीत होते. त्यांची काय हालत झाली? याचे भान ठेवायला हवे,’ असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे.

मोदी सरकारनं घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्तानं सत्ताधारी भाजपनं पुन्हा एकदा या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्ला चढवला आहे. ‘नोटाबंदी हा एक दळभद्री निर्णय होता. देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय होता. त्याचा उत्सव साजरा करणे म्हणजे या निर्णयामुळं उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखेच आहे,’ असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:

परदेशातील काळा पैसा पुन्हा भारतात आणण्याचा व या पैशांतून जनतेच्या बँक खात्यांत प्रत्येकी १५ लाख रुपये टाकण्याचा शब्द पंतप्रधान मोदींनी दिला होता. त्याचे काय झाले?

नोटबंदीमुळे कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद संपून जाईल. दहशतवादास जो अर्थपुरवठा केला जातो तो काळा पैसा असतो. त्यात बनावट नोटांचे प्रमाण जास्त असते. तेच आता बंद होईल, त्यामुळे कश्मीर खोऱ्यातील रक्तपातास लगाम लागेल, असं बोललं गेलं. पण प्रत्यक्षात तसे काही झाले आहे काय?

पंतप्रधान व त्यांचे सहकारी नोटबंदीचा चौथा वाढदिवस रविवारी साजरा करीत होते. त्यावेळी जम्मू-कश्मीरच्या माछिल क्षेत्रात अतिरेकी घुसले. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत चार लष्करी जवानांना वीरमरण पत्करावे लागले. कश्मीर खोऱ्यात घुसखोरी व चकमकी वाढल्या आहेत. जवानांच्या बलिदानाचा आकडा वाढतो आहे. म्हणजे ‘काळा पैसा’, बनावट ‘नोटां’चा सुळसुळाट कायम असून नोटबंदीचा परिणाम दहशतवाद्यांवर झालेला नाही.

नोटबंदीने झोपलेली अर्थव्यवस्था पुन्हा उठलेली नाही. लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या. देशाच्या आर्थिक विकासाची गती मंदावली, पण पंतप्रधान सांगतात, निर्णयामुळे पारदर्शकतेला बळ मिळाले. आर्थिक व्यवहाराला सुसूत्रता आली. हे सर्व सरकारी ‘वक्तव्य’ आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे.

वाचा:

मुंबईत खून, आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यात अटक झालेल्या पिवळ्या पत्रकारासाठी भाजपचे लोक छात्या बडवत रस्त्यावर उतरतात. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या नटीच्या समर्थनासाठी जपजाप्य करतात, पण नोटबंदीने लाखो लोक निराधार, बेरोजगार झाले त्यांच्यासाठी सहानुभूतीचा शब्द निघत नाही. यात काही पारदर्शक वगैरे म्हणता येणार नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here