राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने अमृता फडणवीस राज्यातील राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही त्यांनी राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली होती. आता तर त्यांनी थेट अमेरिकेतील निवडणुकांसंदर्भात भाष्य केलं आहे. कमला हॅरिस यांच्या विजयानंतर त्यांनी त्याच्या भाषणाचा व्हिडिओ रिट्विट केला आहे.
अमृता फडणवीस यांनी व्हिडिओ रिट्विट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे. ‘अगदी खरं आहे. लोकशाही ही एक स्थिती नसून ती कृती आहे. याचाच अर्थ असा की देशातील लोकशाहीची खात्री देता येत नाही. ही तितकीच मजबूत आहे जितकी त्यासाठी आपली लढण्याची इच्छा. म्हणूनच त्याचं रक्षण करा आणि लोकशाहीला कधीही गृहित धरु नका,’ असं सूचक ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
कोण आहेत कमला हॅरीस
कमला हॅरिस यांच्या निवडीने एक इतिहास रचला गेला. उपाध्यक्ष म्हणून निवडीनंतर आता त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पर्व सुरू होईल. वॉशिंग्टनच्या हॉर्वर्ड विद्यापीठात पदवी आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून कमला हॅरिस यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. डिस्ट्रिक्ट अॅटर्नी म्हणून २००४मध्ये करिअर सुरू केलेल्या कमला यांनी २०११मध्ये कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरलपद मिळवले. पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकी अमेरिकी महिला अॅटर्नी जनरल होण्याचा त्यांना मान मिळाला. २०१७मध्ये त्या कॅलिफोर्नियाच्या सिनेटर झाल्या. वक्तृत्व आणि अभ्यासवृत्ती त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची ठरली. मात्र, उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवडीत त्यांच्या या गुणांइतकीच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरली, असे म्हटले जाते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times