पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणीच्या मामाने याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तिघा नराधमांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. दिवाळी सणासाठी ती ३ नोव्हेंबर रोजी तिच्या भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता तरुणी औषधे आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. म्हणून तिच्या मामाने ८ नोव्हेंबर रोजी सकाळी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असल्याने तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केली असता ती त्यांचीच भाची होती. रुग्णालयात तरुणीवर उपचार सुरू होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. म्हणून तिला तातडीने रुग्णवाहिकेतून धुळ्याला नेण्यात आले. धुळ्याला जात असताना तरुणी शुद्धीवर आली. आपले अपहरण करून तीन तरुणांनी सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर एका महिलेच्या मदतीने बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले. अत्याचार करणाऱ्या टोळी गावातील तीन तरुणांची नावेही तिने सांगितली.
उपचारादरम्यान मृत्यू
पीडित तरुणीला तिच्या नातेवाईकांनी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होते. ९ नोव्हेंबर रोजी पीडितेची प्रकृती चिंताजनक होती. तिला बोलताही येत नव्हते. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. तिने वैद्यकीय महाविद्यालयात अखेरचा श्वास घेतला.
काय घडलं?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेबाबत माहिती समोर आली आहे. टोळी गावातील रहिवासी असलेले संशयित आरोपी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील या तिघांनी पीडितेचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा संशय आहे. यातील शिवानंद पवार हा पीडितेवर मैत्री करण्यासाठी दबाव टाकत असे. पीडितेने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना नातेवाईकांना घटनेबाबत माहिती दिली. ७ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिचे पारोळा शहरातून अपहरण केले. त्यानंतर तिला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन रात्रभर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार केला असता, तिघा नराधमांसह एका अनोळखी महिलेने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
संघटना आक्रमक
या घटनेमुळे काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय सदस्य पांडुरंग बाविस्कर, उत्तम मोरे, लक्ष्मण महाले, मंगेश मोरे आदींनी पारोळा येथे जाऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पारोळा पोलिसांची भेट घेऊन आरोपींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही, तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. पारोळा शहरात तणावाचे वातावरण आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times