पाटणाः बिहार निवडणुकीसाठी( ) आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी ( ) सुरू झालीय. आता ही मतमोजणी रात्री उशिरापर्यंत होणार आहे. तसंच करोना प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांचे निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ३ कोटी मतांची मोजणी झाली होती. मतमोजणी दिवसभर आघाडीवर असलेली एनडीए संध्याकाळनंतर काहीशी मागे पडली आहे. आता बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडी ( महागठबंधन ) एनडीएमध्ये आता बोटावर मोजण्याइतक्या जागांचा फरक आहे. यामुळे बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३ जागांवर २०० मतांचा फरक, ९ जागांवर ५०० मतांचा फरक, १७ जागांवर १००० मतांचा फरक, ३३ जागांवर २० हजार मतांचा फरक, ४८ जागांवर ३००० मतांचा फरक आणि ६८ जागांवर ५००० मतांचा फरक होता.

करोना संकटामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बिहारमध्ये निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीदरम्यान करोना व्हायरस संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. यामुळे कुठल्याही घाईघाईत कुठलाही निकाल जाहीर करू नका. आवश्यक तेवढ्या वेळातच मतमोजणी पूर्ण करा, असे आदेश निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. करोनामुळे मतमोजणीच्या नियमांमध्ये बदल झाल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालेल, असं आयोगाने म्हटलं आहे.

बिहारमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतमोजणीच्या ४८५८ फेऱ्या झाल्या आहेत. मोतमोजणीच्या एकूण ७७३७ फेऱ्या होणार आहेत. आतापर्यंत ११९ मतदारसंघांमधील मतमोजणी निम्म्यावर आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त आशिष कुंद्रा यांनी दिली.

सुशीलकुमार मोदी नितीशकुमारांना भेटले

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव हे संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास जेडीयू नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

आरजेडीचा नितीशकुमारांवर आरोप

मुख्यमंत्री नितीशकुमार हे आपल्या सत्तेच्या बळाचा वापर करून मतमोजणीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला. बिहारमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित आहे. राज्यात २०० टक्के महागठबंधनचेच सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर आरजेडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राघोपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत. त्यांचे मोठे बंधु तेज प्रताप यादव हे हसनपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here