म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दिवाळीच्या फराळाची लगबग घरोघरी सुरू झाली असताना डाळी मात्र महागल्या आहेत. नवीन माल बाजारात येण्याआधी मागणी वाढल्याचा डाळींच्या किमतीवर परिणाम होत आहे. जवळपास सर्वच डाळी १२० रुपये किलोच्या वर गेल्या आहेत.

दिवाळीवेळी फराळामुळे विविध डाळींच्या मागणीत वाढ होत असते. त्याचवेळी हा काळ डाळींचा नवीन माल बाजारात येण्याचा असतो. परंतु हा माल पूर्ण जोमाने बाजारात येण्याआधीच मागणी वाढल्याने मुंबई शहर व उपनगरातील किरकोळ बाजारात डाळींच्या भावात वाढ झाली आहे.

कुर्ला परिसरातील डाळव्यापारी दिनेश कुमार यांनी सांगितले की, ‘नवीन डाळ सध्या बाजारात येण्याची चाहुल लागली आहे. पण त्याचआधी मागील १० दिवसांत मागणी ५० ते ६० टक्क्यांनी वाढल्याचे दिसले आहे. त्यामुळे आठवडाभरातच डाळींच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. आणखी किमान आठवडाभर ही वाढ कायम असेल. त्यानंतर दर स्थिर होतील. नवीन माल आल्यास दरांत घसरण अपेक्षित आहे.’

मुंबईच्या बाजारात दररोज ५५० ते ६०० गाड्या इतकी डाळींची मागणी असते. त्या तुलनेत आवकही तेवढीच असते. पण अद्याप नवीन माल बाजारात न आल्याने जुन्या डाळींची आवक मंदावली आहे. व्यापारी जुन्या डाळींचा साठाच विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांकडे जुना साठा असल्याने तो माल सध्या पुरवणे सुरु आहे. त्या तुलनेत मागणी वाढलेली आहे. त्याचा किमतीवर परिणाम होत आहे.

सध्या डाळींचे भाव वधारले असले तरी नॅशनल बल्क हॅण्डलिंग महामंडळाच्या आकडेवारीनुसार डाळीच्या उत्पादनात यंदा आशादायी चित्र आहे. तूरलागवड क्षेत्रात ९.७८ टक्के तर प्रत्यक्ष उत्पादनात ५.४८ टक्के वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उडदाच्या उत्पादनात तर तब्बल ४५.३८ टक्के वाढीची चिन्हे आहेत. यामुळे सध्या १२० रुपयेप्रति किलो असलेली डाळ येत्या काळात स्वस्त होण्याची आशा आहे. मिगाच्या उत्पादनात मात्र लागवड क्षेत्र १९.७० टक्क्यांनी वाढले असतानाही ३.९१ टक्क्यांची घट होण्याची चिन्हे आहेत.

डाळींचे भाव (प्रतिकिलो)

डाळीचा प्रकार… मागील महिन्यात… सध्या

तूरडाळ… १२०… १०५-१०८

हरभरा डाळ… १०५-११०… ९०-९५

मूग डाळ… ११५-१२०… १४५-१५०

उडीद डाळ… ८०-८५… ९५-१००

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here