म. टा. खास प्रतिनिधी, : नात्यांचा गुंता घट्ट होण्याऐवजी जाचक होत गेला की त्याचा मार्ग अनेकदा गुन्ह्याच्या दिशेने जात असल्याची अनेक उदाहरणे घडतात. तसाच काहीसा प्रकार माटुंगा पोलिसांच्या तपासातून उघडकीस आला आहे.

उच्चशिक्षित आणि उच्च पदावर असलेल्यांनी कटकट संपविण्यासाठी म्हणून थेट हत्येची सुपारी देण्याचा प्रकार केला. पण, हा कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच पोलिस सूत्रधारांपर्यंत पोहोचले आणि पुढील अनर्थ टळून प्रियकराचे प्राण वाचले. त्यात प्रियकराची सुपारी देणाऱ्या नामांकित बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकास अटक केली आहे. तर, या महिलेचा प्रियकर हा पालिकेत सब इंजिनीअर म्हणून सेवेत आहे. तर हत्येची सुपारी घेणारा हा विज्ञानाचा पदवीधर आहे.

मुंबईतील एका बँकेत सहाय्यक व्यवस्थापक असलेल्या महिलेचे आणि पालिकेत सब इंजिनीअर असलेल्याचे एकमेकांवर प्रेम होते. त्या दोघांचेही पूर्वीच लग्न झाले असून, कालांतराने ते एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यामध्ये निर्माण झाले. प्रियकराने लग्नानंतरही आपल्याशी जवळीक ठेवावी म्हणून सहाय्यक व्यवस्थापक महिलेचा आग्रह होता. काही काळानंतर इंजिनीअरने तिच्यासोबतचे सर्व नाते संपविले. त्याचा त्या महिलेस राग आला आणि तिने त्याचा सूड घेण्याचे ठरविले.

महिलेने सुपारी देण्याचे ठरविले आणि इंजिनीअरची हत्या करण्यासाठी ओडिशातील एका भाडोत्री हल्लेखोराला सुपारी दिली. हा हल्लेखोर रविवारी दादर स्थानकात आल्यानंतर ही महिला त्यास बंदूक आणि पाच गोळ्या देणार होती. पण माटुंगा पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईने हल्लेखोर, सूत्रधार गजाआड झाले असून, सब इंजिनीअरचा जीव बचावला आहे. या प्रकरणात सूत्रधार महिला आणि हल्लेखोर एकमेकांच्या संपर्कात कसे आले, बंदूक आणि गोळ्यांचा बंदोबस्त कसा झाला आदींचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी भीमराव इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह घाटगे, उपनिरीक्षक भरत गुरव, पोलीस नाईक पाल, पवार, शेलार, शिपाई, मोसमकर आदींनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here