म. टा. प्रतिनिधी, : सांगलीतील काळी खाण परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. प्रदीप राजू हंकारे (वय ३०, रा. मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. बुधवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास घडलेला प्रकार सकाळी उघडकीस आला. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हंकारे याचा प्लंबिंगचा व्यवसाय होता. मंगळवारी सकाळी तो दुचाकीवरून कामानिमित्त घरातून बाहेर पडला. दिवसभर तो बाहेरच होता. रात्री नऊच्या सुमारास त्याने घरात आईला फोन करून उशिराने येणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या काही मित्रांनी घरी फोन केला. प्रदीप दारू पिऊन विश्रामबाग परिसरात पडला असून त्याला घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी पोलिसांनी प्रदीपच्या घरी फोन करून त्याचा मृतदेह काळ्या खणीजवळ सापडल्याचे सांगितले. डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक अजित टिके आणि निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

प्रदीप हंकारे याचा त्याच्या मित्रांनीच खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मंगळवारी रात्री त्याच्या घरी फोन करणार्‍या मित्रांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना केल्याचे उपअधीक्षक टिके यांनी सांगितले. मृत प्रदीप हंकारे हा विवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत. काळ्या खणीजवळ मुख्य रस्त्यालगतच खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here