म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कोविड-१९ (करोना) संसर्गामुळे देशातील सामाजिक, आर्थिक वातावरण अस्थिर झाल्यामुळे लोकांचा ओढा सोन्यातील गुंतवणुकीकडे वाढला आहे. त्याचप्रमाणे ठेवून कर्जे काढण्याकडेही लोकांचा ओढा वाढत असल्याचे निरीक्षण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने ताज्या अहवालात नोंदवले आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. करोनामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला असून त्यातून बाहेर येण्यासाठी सुवर्णकर्जांचा आधार घेतला गेला आहे. ही सुवर्णकर्जे बँका, बिगरबँक वित्तसंस्था आणि काही प्रमाणात सराफांकडूनही घेतली गेली आहेत. यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१) सुवर्णकर्जांची रक्कम ४,०५,१०० कोटी अर्थात सुमारे ५५.२० अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१९-२०) ३,४४,८०० कोटी किंवा ४७ अब्ज डॉलरची सुवर्णकर्जे घेतली गेली होती.

यासंदर्भात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे व्यवस्थापकीय संचालक, सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, ‘कुटुंबे आणि छोटे उद्योग यांची पैशाची गरज भागवण्यासाठी सुवर्णकर्जे हा कायमच मोठा आधार ठरली आहेत. विशेषतः अल्पमुदतीची पैशांची गरज भागवण्यासाठी सोने तारण ठेवून कर्जे घेण्याची मोठी परंपरा देशात आहे. असे सुवर्णकर्ज असंघटित क्षेत्राकडून (सावकार किंवा सराफ) घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून आता बँका, वित्तसंस्था अशा संघटित क्षेत्रातील संस्थाही सुवर्णकर्जे उपलब्ध करून देऊ लागल्या आहेत. करोनामुळे मात्र लोकांचा कल बँका, बिगरबँक वित्तसंस्था यांच्याकडूनच सुवर्णकर्जे घेण्याकडे असल्याचे दिसून आले आहे.’

भारतीयांच्या मनात सोन्याविषयी पवित्र कल्पना आहेत. सोन्याची खरेदी ही अनिवार्य खरेदी समजली जाते. सोने खरेदीचा संबंध धार्मिक, पारिवारिक घटनांशी जोडला जातो. सोने अंगावर वागवणे शुभ मानले जाते. त्यामुळे एकदा खरेदी केलेले सोने, त्यातही सोन्याचा दागिना हा सहजासहजी विकला जात नाही. म्हणूनच घरातील बचत अबाधित ठेवण्यासाठी रोखीचे रूपांतर सोन्यात करण्याकडेही कल असतो. भांडवल राखून ठेवण्यासाठी अनेक छोटे उद्योग सोन्यात गुंतवणूक करतात. सध्या करोनाकाळात आपत्कालीन स्थिती म्हणून सोने न विकता त्यावर कर्ज काढले जात आहे, याकडेही वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने लक्ष वेधले आहे.


सुरुवात २०१९ पासून
बिगरबँक वित्तसंस्थांकडून सुवर्णकर्जे काढण्याचे प्रमाण करोनाकाळात वाढले असले तरी, याची सुरुवात जुलै २०१९ पासून झाली आहे. जुलै २०१९ पासून सोन्याची किरकोळ किंमत सातत्याने वाढत आहे. सोन्याच्या किंमती यावर्षी २८.८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच सोने तारण ठेवून अधिक रकमेचे कर्ज मिळणे शक्य होत आहे. सोन्याच्या बदल्यात कर्ज हे केवळ कर्ज घेणाऱ्यासाठी (ऋणको) फायद्याचे ठरत नसून, त्याचबरोबर असे कर्ज देणाऱ्या (धनको) संस्थेसाठीही हा व्यवसाय फायद्याचा ठरत आहे.

सुवर्णकर्जांतील वाढ

वर्ष सुवर्णकर्जे (कोटी रु.)
२०१९-२० ३,४४,८००
२०२०-२१ ४,०५,१००
२०२१-२२ ४,६१,७०० (अंदाज)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here