या आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंग करण्यात येणार असल्याचे समजत होते. बीसीसीआय आपल्या पारितोषिकांमध्ये ५० टक्क्याने घट करणार असल्याचेही ऐकिवात येत होते. त्यामुळे यावेळी आयपीएल विजेत्या आणि उपविजेत्या संघाला जास्त बक्षिसांची रक्कम मिळणार नाही, असे म्हटले जात होते. पण जेव्हा पारितोषिक वितरण सोहळा झाला तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबईने विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर बक्षिस घेण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा हा मंचावर गेला होता. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी रोहितला तब्बल २० कोटी रुपयांचा धमादेश दिला. करोनामुळे आयपीएल युएईमध्ये खेळवली गेली होती. त्यामुळे यावेळी बीसीसीआय बक्षिसाची रक्कम अर्धी करेल, असे वाटले होते. पण या संकटाच्या काळातही बीसीसीआयने आपली बक्षिसाची रक्कम कमी केलेली पाहायला मिळाली नाही. त्यामुळेच मुंबईच संघ चांगलाच मालामाल झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा उपविजेता ठरला. त्यामुळे पारितोषिक वितरण करत असताना श्रेयस अय्यर दिल्लीचे बक्षिस घेण्यासाठी मंचावर गेला. त्यापूर्वी उपविजेत्या संघाला सव्वा सहा कोटी रुपये मिळतील, असे वाटत होते. कारण यापूर्वी उपविजेत्याला १२ कोटी रुपये मिळत होते, त्याचे अर्धे सव्वा सहा कोटी दिल्लीला मिळतील असे वाटत होते. पण श्रेयसला ज्यावेळी १२ कोटी रुपयांचा धनादेश दिला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
कर्णधार रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने यावेळी आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान लीलया पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. रोहितने यावेळी ५१ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६८ धावांची दमदार खेळी साकारली आणि मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत सहज जेतेपद मिळवले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times