पुणे पदवीधर मतदार संघातून लाड यांच्यासह नीता ढमाले, उमेश पाटील, हे इच्छुक होते. बंडखोरी होऊ नये म्हणून पक्षाने अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चित केली नाही . पण, उमेदवाराची वाट न पाहता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सरसेनापती म्हणून ओळखले जाणारे माने यांनी बुधवारी आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर .के. पोवार, मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच माने यांनी बंडखोरीचा निशाणा फडकवला आहे. मंत्र्यांच्या सेनापतीने बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे. यामुळे दोन दिवसात माने माघार घेऊन लाड यांना पाठिंबा देणार की बंडाचा निशाना कायम ठेवणार यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे.
वाचा:
गेल्या निवडणुकीत पक्षाने सारंग पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर लाड यांनी बंडखोरी केली होती, त्याचा फटका पक्षाला बसला आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा विजय सुकर झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत ढमाले यांच्यापाठोपाठ माने यांनीही बंड केल्याने भाजप मात्र आनंदात आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड आणि औरंगाबाद विभागात सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे विभागीय मतदारसंघातील निवडणुकीत यापूर्वी भारतीय जनता पक्षाकडून सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
वाचा:
पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादीकडून अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, उमेश पाटील, नीता ढमाले यांची नावे चर्चेत होती. उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्यामुळे उमेदवारांसह समर्थकांतही धाकधूक वाढली होती.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास फेसबुक पेजवर यासंबंधी माहिती जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे, ‘विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times