म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपळे सौदागर येथे कारवाई करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार रहाटणी फाटा येथे घडला. गेल्या १५ दिवसांमध्ये पोलिसांवर हल्ला होण्याची ही चौथी घटना आहे.

नीलेश भाऊ माने (वय ४६, रा. गजानननगर, रहाटणी, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सहायक फौजदार रवींद्र बाळकृष्ण महाडिक (वय ५६) यांनी मंगळवारी (१० नोव्हेंबर) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार महाडिक आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलिस सोमवारी रात्री रहाटणी फाटा येथे कर्तव्य बजावत होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. तेव्हा माने विरुद्ध दिशेने येताना दिसले. त्यामुळे महाडिक आणि अन्य पोलिसांनी त्यांना थांबविले. यावर माने यांनी वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केला.

हा प्रकार सहायक फौजदार महाडिक यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी माने यांना हटकले. त्या वेळी ते मोबाइल तिथेच टाकून पळून गेले. काही वेळानंतर माने वाहतूक पोलिसांकडे आले आणि त्यांनी ‘तुम्ही कारवाई का करता, तुम्हाला अधिकार आहे का?’ असे पोलिसांना विचारले. त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत माने याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी माने यांना अटक केली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

पोलिसांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच

सांगवी, वाकड, रहाटणी आणि चिंचवड या चार ठिकाणी मागील पंधरा दिवसांत वाहतूक पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चिंचवडमध्ये झालेल्या घटनेत पोलिस अंमलदार गंभीर जखमी झाले होते. त्यांनी जीवाची पर्वा न करता कारचालकाला अडवून त्याच्यावर कारवाई केली होती. सातत्याने पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here