सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल उपायुक्त प्रताप जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण, महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे आदी उपस्थित होते.
महसूल विभागाचे उपायुक्त हे या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असणार आहेत. या कक्षामध्ये नायब तहसीलदार आणि लिपिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाचे कामकाज सोमवारपासून सुरू करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज आणि निवेदने या कक्षात स्वीकारण्यात येणार असून, संबंधितांना त्याची पोहोच पावती दिली जाणार आहे. क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज किंवा निवेदने ही विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या स्तरावरून कार्यवाही होणे आवश्यक असलेल्या प्रकरणांशी संबंधित अर्ज किंवा निवेदने ही मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे सादर केली जाणार आहेत.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही आणि प्रलंबित अर्जांची माहिती या कक्षात प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी सादर करण्यात येणार आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले अर्ज किंवा निवेदने ही पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेल्या ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्षात’ सादर करावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times