म. टा. प्रतिनिधी, : ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण, असा तगादा लावत विवाहितेला मारहाण करून विष प्राशन करण्यास भाग पाडून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणात आरोपी पतीसह सासूने सादर केलेला नियमित जामीन अर्ज एस. एस. भिष्मा यांनी फेटाळून लावला. राकेश प्रेमचंद राठोड (२५) आणि निर्मलाबाई प्रेमचंद राठोड (४२, दोघे रा. नांदातांडा ता. ) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात मृत सुवर्णा यांचे वडील अंकुश लक्ष्मण चव्हाण (५५, रा. कावडगांव ता. खामगांव जि. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली. चव्हण यांची मुलगी सुवर्णा हिचे लग्‍न १५ मे २०१८ रोजी आरोपी राकेश राठोड याच्याशी झाले होते. सुवर्णाला दीड वर्षाचा मुलगा असून, ती आठ महिन्यांची गर्भवती होती. लग्‍नात हुंडा न दिल्याने आरोपी राकेशसह त्याचे वडील व आई यांनी सुवर्णाला,’ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण,’ असा तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ करित होते. ही बाब सुवर्णाने आई-वडिलांना सांगितली होती. एप्रिलमध्ये सुवर्णाची प्रकृती ठीक नसल्याने तिला माहेरी आणले होते. मेमध्ये आरोपी राकेश राठोड गावातील दोघे जण चव्हाण यांच्या घरी आले. त्यांनी सुवर्णाची समजूत घालून तिला पुन्हा सासरी आणले.

१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राकेश राठोड याने अंकुश चव्हाण यांना फोन करून सुवर्णाने विषारी औषध प्राशन केल्याने तिला बुलडाणा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. उपचार सुरू असताना १६ ऑक्टोबर रोजी सुवर्णाची प्रस्तूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. सुवर्णावर दोन दिवस उपचार केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्याचे सांगितले. २० ऑक्टोबर रोजी सुवर्णाला घाटीत आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाने आरोपींची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपी राकेश व निर्मलाबाई राठोड यांनी नियमीत जामिनासाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी काम पाहिले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here