मुंबईः आज १२२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ४ हजार ४९६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग वाढताना दिसत होता. ऑक्टोबरमध्ये करोना संसर्गात उतार येत आहे. नवीन रुग्णसंख्येतही लक्षणीय घट होत आहे तर, रुग्ण बरो होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांच्यावर आहे. हा नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. दिवाळी सणाच्या तोडांवर हे शुभसंकेत मिळत असताना नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे. मात्र, दिवाळीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानंही जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

आज राज्यात ४ हजार ४९६ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा १७ लाख ३६ हजार ३२९ इतका झाला आहे. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा अजूनही कमी होत नसल्यानं थोडी चिंता कायम आहे. आजही राज्यात १२२ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६३ टक्के इतका झाला आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ६४ हजार २७५ चाचण्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

आज राज्यात ७ हजार ८०९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ०५ हजार ०५६ करोना बाधित रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ४४ टक्के इतके झाले आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही एक लाखांहून कमी झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत ८४ हजार ६२७ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर, राज्यात ८ लाख ११ हजार ०३५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here