नवी दिल्लीः केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस बाजवली आहे. लेह लडाखमध्ये दाखवण्याऐवजी ट्विटरने जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून दाखवले आहे. या प्रकरणी केंद्राने ट्विटरकडून स्पष्टीकरण मागितले आहे. चुकीचा नकाशा दर्शवून भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल ट्विटरवर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? असे केंद्राने नोटीशीत म्हटलं आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला पाच दिवसांचा अवधी दिला आहे.

ट्विटरला या प्रकरणी ९ नोव्हेंबरला ही नोटीस पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरचे दोन भाग करून जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. यानंतर लेह केंद्र शासित प्रदेश लडाखचा भाग आहे. पण ट्विटरने नकाशात जम्मू-काश्मीरमध्ये लहे दाखवले.

मंत्रालयाने ट्विटरच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंटला नोटीस पाठवली आहे. लेह जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून दाखवणं हे कंपनीने भारताच्या सार्वभौम संसदेच्या इच्छेला आळा घालण्याचा जाणूनबुजून केलेला एक प्रयत्न आहे, असं नमूद करत केंद्र सरकारने ट्विटरला फटकारलं आहे.

ट्विटरने नकाशात केलेला हा घोळ पहिलाच नाही. यापूर्वी ट्विटरने लेहला पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना (चीन) चा भाग म्हणून दाखवलं होतं. यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रातून डोर्सी यांना सुनावत नकाशावर आक्षेप घेतला होता.

यानंतर ट्विटरने नकाशा दुरुस्त केला होता. पण लहे हा केंद्र शासित प्रदेश लडाखचा भाग म्हणून दर्शवण्यासाठी अद्याप नकाशा दुरुस्त केलेला नाही. अद्याप लेह हा जम्मू-काश्मीरचा भाग म्हणून नकाशात दाखवत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here