मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो लोक मुंबईत येतात. दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे दान भक्तांकडून चढवले जाते. या दानामध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणात असते. तर काही भाविक सोन्याचे नाणे, चांदीच्या वस्तू आणि अन्य रत्ने बाप्पाच्या चरणी चढवत असतात. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, एका भक्ताने ३५ किलोचे सोने दान दिले आहे. गेल्या आठवड्यात हे दान दिले होते. या सोन्याचा वापर मंदिराचा दरवाजा आणि छतावर सोनेरी मुलामा देण्यासाठी करण्यात आला. ३५ किलो सोन्याचे दान दिल्यानंतर या भाविकाने आपले नाव सांगण्यास नकार दिला.
३५ किलो सोन्याचे दान मिळाल्यानंतर त्याचा उचित वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सिद्धीविनायकाचे दर्शन घेताना आता भाविकांना एक वेगळाच अनुभव मिळत आहे. याआधी सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे लाकडी होते. परंतु, त्यावर आता चमकदार मुलामा देण्यात आला आहे. दानामध्ये मिळालेल्या सर्व सोन्याचा वापर यासाठी करण्यात आला. १५ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी हे काम करण्यात आले आहे. दरम्यान, २०१७ मध्ये मंदिराला ३२० कोटी रुपयांचे दान मिळाले होते. याचा वापर सामाजिक कार्यासाठी करण्यात आला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times