: घरासाठी पैसे भरले, सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली, घराचा ताबा मिळाल्याने कुटुंबासह राहायला आलो. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत सगळेच चित्र बदलले. आता घरासाठी भरमसाठ देखभाल खर्च (मेन्टेनन्स) भरूनही सुविधा कमी होत आहेत. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत लवासात आता डॉक्टर मिळणेही जिकिरीचे झाले आहे. एखाद्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे…

तालुक्यातील या पंचतारांकित टाउनशिपमध्ये राहणाऱ्या सुमारे बाराशेहून अधिक कुटुंबांपैकी बहुतेकांची सध्या हीच व्यथा आहे. येथील अलिशान सुविधा आणि रमणीय परिसरामुळे हजारो कुटुंबीयांनी येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून निवासी प्रकल्पांची (सदनिका/बंगला) खरेदी केली. घराचा ताबा मिळाल्यानंतर बऱ्याच जणांनी राहण्यासही सुरुवात केली. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये येथील सर्व सुविधांचा वापर सुरू होता; मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकल्पासमोरील अडचणी वाढायला लागल्यानंतर सुविधांचा दर्जा खालावला आहे. लवासामध्ये आजमितीस राहणाऱ्या कुटुंबांची संख्या कमी असली, तरी त्यांच्यासमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.

खऱ्या अर्थाने देशातील पहिली स्मार्ट सिटी असणाऱ्या लवासाची आज मात्र पुरती रया गेली आहे. एकेकाळी पुणेकरांसाठी वीकेंड आणि पिकनिक स्पॉट असणारे हे शहर अर्धवट बांधकामे आणि उखडलेल्या रस्त्यांसाठी ओळखले जात आहे. लवासातील तळ्याकाठच्या अनेक अपार्टमेंटमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत; तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आशियाना नावाचा स्वतंत्र गृहप्रकल्पही विकसित करण्यात आला आहे. मात्र, लवासातील दैनंदिन देखभाल-दुरुस्तीकडे सध्या अजिबात लक्ष दिले जात नसल्याने भिंती, छप्पर गळणे, कचरा साठून राहणे अशा समस्यांनी डोके वर काढले आहे. त्याशिवाय, येथील रहिवाशांसाठी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये सध्या केवळ नावापुरतेच एक डॉक्टर आणि नर्स कार्यरत आहेत. त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत लवासामधील रहिवाशांना पुण्याकडे धाव घेण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही. ज्येष्ठ नागरिकाचा नैसर्गिक मृत्यू झाला, तरी नियमित तपासणी करणारे डॉक्टर आजूबाजूला नसल्याने शवविच्छेदन अहवालाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची खंत येथील रहिवाशी जे. के. पांडे यांनी व्यक्त केली.

३ हजार ३७८ … पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित निवासी प्रकल्पांची संख्या (अपार्टमेंट आणि व्हिला)

१,२८३ … आतापर्यंत ताबा दिलेले निवासी प्रकल्प

२,०९० … बांधकाम ठप्प झाल्याने अर्धवट निवासी प्रकल्प

(क्रमश:)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here