‘भारतीय अधिकाऱ्यांनी स्थानिक एलईडीच वापरण्याचं आवाहन केलं आहे. पण तरीही चीनचे निर्यातदार गुणवत्ता, सेवा आणि किंमतीच्या बाबतीत भारतीय उत्पादनांना मागे टाकत आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी सोमवारी व्होकल फॉर लोकलचा पुन्हा एकदा नारा दिला. पण तरीही चायनिज दिव्यांना एवढी मागणी आहे, की अनेक कंपन्यांना पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ओव्हरटाइम करावा लागत आहे,’ असं ग्लोबल टाइम्सने म्हटलं आहे.
दिवाळीच्या ऑर्डर पूर्ण करता याव्या यासाठी चीनच्या कंपन्या ऑक्टोबरपासूनच पूर्ण ताकदीने काम करत आहेत. चीनचे निर्यातक वांग यांनी वृत्तपत्रात दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, ‘आम्हाला कोट्यवधी युनिट्सच्या निर्यातीची ऑर्डर मिळाली आहे, ज्यात भारताचाही समावेश आहे. आमच्या निर्मिती प्लांटकडे दररोज एक लाख एलईडी लाइट बनवण्याची क्षमता आहे. ही क्षमता ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अपुरी असल्यामुळे अजून क्षमता वाढवली जात आहे.’
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, भारताने गेल्या काही वर्षात १० अब्ज रुपयांच्या एलईडी आयात केल्या आहेत. मोदी सरकार जाणिवपूर्वक चीनच्या वस्तूंवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी स्थानिक उत्पादनांवर भर देण्याचं आवाहन करत आहे, असं ग्लोबल टाइम्सने चीनचे तज्ञ किआन फेंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
मोदी सरकारची ही खेळी कामी येणार नाही. कारण, चीनच्या वस्तू स्वस्त आणि दर्जेदार आहेत, असंही फेंग म्हणाले. भारतात दिवाळी प्रकाशमय असते, पण चीनचे दिवे नसतील तर ही दिवाळी अंधारात होईल, असंही वक्तव्य फेंग यांनी केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times