सार्वभौम सोने खरेदी योजनेअंतर्गत प्रति दहा ग्रॅमसाठी ५१,७७० रुपयांनी करण्याची संधी चालून आली आहे. हा दर बाजारभावापेक्षा ३,३३० रुपयांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षातील ही आठवी मालिका असून, गुंतवणुकीसाठी आज शेवटची मुदत आहे. या योजनेसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.
इच्छुक गुंतवणूकदारांना स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता अन्य सर्व बँकांतून हे रोखे खरेदी करता येतील. तसेच स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अधिकृत पोस्ट कार्यालयांतूनही हे रोखे विक्रीसाठी उपलब्ध असतील. याखेरीज राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथूनही सुवर्णरोख्यांची खरेदी करता येईल.
सुवर्णरोख्यांचा कालावधी आठ वर्षांचा असून, कालावधी पूर्ण होण्याआधी या रोख्यांची विक्री करायची झाल्यास ती कालावधीच्या पाचव्या वर्षापासून करता येईल. किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याच्या युनिटमध्ये, तर कमाल गुंतवणूक चार किलो सोन्याच्या युनिटमध्ये करता येईल. सरकार या रोख्यांवर २.५ टक्के व्याज देणार आहे. हे सुवर्णरोखे शेअर बाजारात सूचिबद्ध असणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times