डिजिटल माध्यमातून सोन्याची खरेदी करणाऱ्यांपैकी ४० टक्के ग्राहक छोट्या शहरांमधील आणि गावांमधील आहेत. सोन्याला वाढती मागणी पाहता पेटीएमने आपल्या सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत ग्राहक एका वेळी अॅपच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी करू शकणार आहेत. पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत होती.
लॉकडाउनच्या काळात सोन्या-चांदीची दुकाने बंद असल्याने ग्राहकांनी सोनेखरेदीसाठी डिजिटल गोल्डचा मार्ग निवडला. ही खरेदी प्रामुख्याने गुंतवणूक, वैयक्तिक वापरासाठी आणि भेट देण्यासाठी करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर हळूहळू डिजिटल सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या सहा महिन्यांत पाच हजार किलो सोन्याची विक्री झाली असून, आगामी काळात मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पेटीएम मनीचे सीईओ वरुण श्रीधर यांनी दिली.
खरेदीची सोपी प्रक्रिया आणि सुलभ व्यवहार यांमुळे ऑनलाइन सोनेखरेदीचा नवा ट्रेंड निर्माण होत आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात आम्ही डिजिटल सोनेखरेदीवर विविध ऑफर देण्याचा विचार करीत आहोत, असेही श्रीधर म्हणाले.
आम्ही डिजिटल गोल्डची सुविधा डिसेंबर २०१७मध्ये सुरू केली. गेल्या तीन वर्षांमध्ये ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली आहे. विविध उत्पन्नगटांतील ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्यावर भर दिला असून, सोनेखरेदी करण्याचे हे सर्वांत स्वस्त माध्यम ठरले आहे. त्यामुळे किमान शंभर रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची सोनेखरेदी केल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती फोनपेच्या प्रवक्त्याने मटाशी बोलताना दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times