जोगेश्वरी पूर्वेकडील शिवकृपा सोसायटीत उद्योजक गांगजी गाला (वय ६२) हे पत्नी, मुलगी दोन महिन्यांच्या नातवासह राहतात. दोन नोकरही त्यांच्यासोबत असतात. बुधवारी तीन शस्त्रधारी लोक त्यांच्या घरात घुसले. त्यांनी घरातील सदस्यांवर केला. मात्र, त्यांच्या मुलीने धाडसाने त्यांना प्रतिकार केला. मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर लुटारू पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यातील दोघांना पकडण्यात आले. ते दिल्लीचे असून, दिवाळीनिमित्त मिठाई वाटण्याच्या बहाण्याने ते घरात घुसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तिघे जण घरात घुसल्याचे गाला यांच्या लक्षात आले. त्यातील एकाने स्क्रू ड्रायव्हर काढून त्यांना धमकावले. तर दोघांनी त्यांची पत्नी आणि नोकरांना रिव्हॉल्व्हर आणि चाकूचा धाक दाखवला. महिला ओरडायला लागल्याने बेडरूममध्ये असलेली त्यांची मुलगी दक्षिता सावध झाली. तिने दोन महिन्यांच्या बाळाला पाळण्यात ठेवले आणि ती बाहेर आली. एकाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने तो चुकवला. यात तिच्या हाताच्या बोटांना इजा झाली. दक्षिताने त्याला ढकलले आणि पुन्हा बेडरूममध्ये पळाली. हल्लेखोराने तिचा पाठलाग केला आणि तिच्या गळ्यातील चेन खेचली. तिच्या मनगटावर त्याने हल्ला केला. दक्षिताने सगळा जीव एकवटून त्याला ढकलले आणि त्याच्या चेहऱ्यावर ग्लासमध्ये असलेला द्रवपदार्थ फेकला आणि बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर बाल्कनीत जाऊन तिने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यामुळे हल्लेखोर घाबरले आणि त्यांनी रिक्षातून पळ काढला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग केला. तिघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं.
मोहम्मद अलिम फाजिल शेख (वय २८) आणि मुस्तकिम शेख (वय ४०) अशी आरोपींची नावे आहेत. सद्दाम (वय २६) हा पसार झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून स्क्रू ड्रायव्हर, चाकू, गावठी पिस्तूल आणि सेलो टेप जप्त केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times