वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना जामीन मंजूर करणाऱ्या सर्वोच्च न्यायालय व संबंधित न्यायमूर्तींवर टीका करणाऱ्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर न्यायालयीन अवमान खटला दाखल करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, कामरा यांनी आपल्या विधानांवर ठाम असून, माफीही मागणार नाही आणि दंडही भरणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
अर्णव गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेऊन त्यांना जामीन मंजूर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती व यांच्या निकाल पद्धतीवर कामरा यांनी ट्वीटरवरून टीका केली होती.
त्यानंतर विधि शाखेचा विद्यार्थी श्रीरंग काटनेश्वरकर याच्यासह आठ जणांनी कामरा यांच्या विरोधात अवमान खटला दाखल करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कामरा यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यास या सर्वांना परवानगी दिली आहे. आपल्या पत्रात वेणुगोपाल म्हणतात, ‘सर्वोच्च न्यायालयावर अन्याय्य आणि लज्जास्पद हल्ला करणाऱ्यांना शिक्षा होते, याची जाणीव लोकांना होणं गरजेचं आहे’.
वाचा : वाचा :
यावर कुणाल कामरा यांनी शुक्रवारी आपली बाजू मांडली. ‘वकील नाही, माफी नाही, दंड नाही’, असं ट्वीट त्यांनी केलंय. ‘आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने माझ्या ट्वीटबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र माझे ट्वीट अवमानकारक असल्याचं घोषित करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य नक्कीच असेल’, असं कामरा यांनी म्हटलंय.
कामरा यांनी अनेकदा अर्णव गोस्वामी यांच्यावर व्यंगात्मक टीका केली आहे. जानेवारीमध्ये इंडिगो कंपनीच्या विमानात प्रवासादरम्यान त्यांनी गोस्वामी यांच्याशी वादही घातला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेक विमान कंपन्यांनी बंदी घातली होती.
उल्लेखनीय म्हणजे काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावरही काही ट्विटवरून न्यायालय अवमान खटला चालला होता. यावेळी, प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर न्यायालयाकडून प्रशांत भूषण यांच्यावर एक रुपयाचा दंड लावण्यात आला होता.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times