मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील वनडे आणि ट्वेन्टी-२० संघात रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. रोहित शर्मा हा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा उपकर्णधार आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात रोहितला वनडे आणि टी-२० संघात का स्थान दिले नाही, याबाबताच खुलासा आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला आहे.

रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याचे सांगत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकाही संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण रोहित त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला आणि सर्वांनीच बीसीसीआय व कर्णधार विराट कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर रोहितला भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले. पण रोहितला वनडे आणि टी-२० संघात स्थान दिले नाही, याबाबतचा खुलासा आता गांगुली यांनी केला आहे.

याबाबत गांगुली म्हणाले की, ” रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला ७० टक्के तंदुरुस्त आहे. त्यामुळेच रोहितला वनडे आणि टी-२० संघात स्थान दिले नाही. पण त्याला कसोटी संघात मात्र संधी देण्यात आली आहे. रोहित हा किती तंदुरुस्त आहे की नाही, हे तुम्ही रोहितलाच का विचारत नाही?”

रोहितला आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा हा त्यानंतर चार सामने खेळू शकला नव्हता. पण त्यानंतर रोहित हा तीन सामने खेळला आणि संघाला जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलला. रोहितला जेव्हा दुखापत झाली होती. त्यानंतर निवड समिती आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे युएईमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी संघाची निवड केली आणि रोहितला एकाही संघात स्थान दिले नव्हते. पण त्यानंतर काही तासांमध्येच रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी सराव करायला नेट्समध्ये उतरला होता. त्यामुळे सध्याच्या घडीला रोहित शर्मा आणि निवड समिती यांच्यामध्ये आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर यामध्ये कुठेतरी कर्णधार विराट कोहलीचाही हात असावा, असे चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे रोहित शर्मा भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलियाला न जाता युएईमधून थेट भारतात परत आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here